चंद्रपूर, दि.25
चंद्रपूर विधानसभेत उमेदवारी वरून सद्या सर्वच पक्षांची दमछाक होताना दिसत आहे. चंद्रपूर भाजप मध्ये वातावरण सर्वात जास्त ढवळल्याचे दृष्टिपथास पडत आहे. हे वातावरण बंडखोरीचे आव्हान उभे करते की काय? इतक्या विकोपाची स्थिती पाहायला मिळत आहे.
ब्रिजभूषण पाझारे हे भाजप चे निष्ठावान मानले जातात. सुधीर भाऊ त्यांचे राजकीय गुरू असून पाझारे हे भाऊंचे कट्टर समर्थक म्हणून ज्ञात आहेत. पक्षात सुद्धा त्यांची चांगली प्रतिमा आणि कार्यकर्त्यात छाप आहे. दोन वेळा त्यांच्यावर अन्याय झाल्याचे बोलले जाते. यावेळी त्यांना उमेदवारी मिळावी अशी सर्व निष्ठावान नेते व पदाधिकाऱ्यांची भावना आहे. मात्र त्यांना डावलून भाजपतून गेलेल्या आमदारास तिकीट देण्याचा घाट घातला जात असल्याचे सार्वजनिक झाल्याने कट्टर भाजप कार्यकर्त्यात तीव्र भावना उमटताना दिसत आहेत.
आज शेकडो भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपूर ला रवाना झाले. देवा भाऊ सोबतच या सर्वांच्या भावना पाझारे यांच्या सहानुभूती आणि समर्थनाच्या असल्याचे यावेळी दिसून आले.
जोरगेवार भाजप ला नवा आकार देतील?
किशोर जोरगेवार हे नेते म्हणून समर्थ असून त्यांच्यात आवश्यक व पूरक असे सारेच गुण आहेत. राजकीय विश्लेषक मानतात की, भाऊ नंतर चंद्रपूर भाजपात स्टार चेहरा नाही. समूहाला लीड करेल अशी लीडरशिप नाही. लोकसभेत जे घडले त्यातून भाऊंच्या प्रतिमेला थोडासा धक्का पोहोचल्याचे लपून राहिलेले नाही. वरच्या स्तरावर सुद्धा पूर्वीसारखे पोषक वातावरण राहिलेले नाही. खुद्द भाऊंचे निकटवर्तीय असलेले राजकीय विश्लेषक मानतात की, “तोडा आणि फोडा” तत्वाशिवाय ते निवडणूक जिंकू शकले नसते. अशा स्थितीत भाजपला आता लोकप्रिय असलेल्या आणि मुरब्बी चेहऱ्याची गरज असल्याचा सुद्धा सुर ऐकू येऊ लागला आहे. त्यामुळे भाजप मध्ये एक गट हा बदलाचे स्वागत करणारा असल्याचे सुद्धा बोलले जाते. ही निवडणूक त्याची नांदी ठरेल, असेही अनेकांना वाटते.
काँग्रेस ची स्थिती याहून वाईट आहे. काही राजकीय विश्लेषक निवडणुकी पूर्वीच काँग्रेस चे मोठे नुकसान होण्याची भविष्यवाणी करताना दिसत आहेत. कदाचित परिवर्तनाचा नियम इथेही समानतेने लागतो की काय? अशीच चर्चा आहे.