सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल
चंद्रपूर, दि. 22 :
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 31 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 56 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 24 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.
000000