स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात अवैध दारु तस्करी उघड झाली असून पोलीसांनी या प्रकरणी मुद्दे मालासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनूसार जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पथक तयार करून जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहेत. याच श्रेणीत 17 आक्टोबर रोजी LCB चे पथक मूल पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असताना गोपनीय माहिती मिळाली की, सुशी जानाळा मार्गे अवैधरीत्या दारूची वाहतूक होत आहे. या माहीतीवरून तात्काळ जानाळा-सुशी मार्गावर नाकाबंदी करून सदर वाहन पकडले. तपासणी केली असता त्यामध्ये रॉकेट संत्रा देशी दारू (1000 नग 90 ml), असे एकूण 10 पेट्या मिळून आल्या.
देवानंद बुरांडे रा. सुशी ता. मुल, या आरोपीला ताब्यात घेऊन 35 हजाराची दारू व एक महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन किंमत 5 लाख, असा एकूण 5 लाख, 35 हजारांचा मुद्देमाल LCB पथकाने जप्त केला असून आरोपी विरोधात मुल पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर, पोउनि मधुकर सामलवार, पोह. नितीन साळवे, सुभाष गोहोकार, पोशि. मिलींद जांभूळे यांनी केली आहे.