चंद्रपूर जिल्हयात सातत्याने घडत आहेत अत्याचाराच्या घटना
फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी
(संजय शिंदे. दुर्गापूर)
दुर्गापूर पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या एका घटस्फोटित महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दुर्गापूर येथील हार्डवेअर व्यावसायिक संजय गिलबिले याच्याविरुद्ध दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला आहे. दरम्यान एका राजकीय पक्षाशी संबंधित सदर आरोपीला तात्काळ अटक न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पिडीत महिला व तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्याचा आग्रह सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांकडून कऱण्यात आला आहे. राजकीय पक्षाशी सबंधित आरोपींचे एक अमानवी लैंगिक शोषणाचे प्रकरण जिल्हयात गाजत असताना हे प्रकरण पुढे आल्याने सामाजिक चिंता व्यक्त होत आहे.
३५ वर्षीय पीडितेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर गायत्री हार्डवेअर नावाचे दुकान आहे. त्याचा मालक संजय गिलबिले (45) याची 5 जून 2022 पासून ओळख पटली. पत्नी आणि मुलांना सोडून तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवून आरोपी संजय दोन वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता त्याने त्याच्या मित्राला बंगाली कॅम्प परिसरातील रूममध्ये आणले. पिडीतेने यावर आक्षेप घेताच आरोपीने तिला मारहाण केली. यानंतर ती आई-वडिलांकडे गेली. दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात आरोपींनी येऊन मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, मारहाण, धमकी देणे, जातीवाचक शिवीगाळ आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राजकीय दबाव येऊं शकतो अशी शंका समाजसेवक विनोद खोब्रागडे यांना आली. कारण पिडीत महिलेने त्यांना संपर्क करून सम्पूर्ण प्रकाराची माहिती दिली होती. त्यामूळे खोब्रागडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देत योग्य न्याय, तात्काळ अटक आणि फास्ट ट्रॅक कोर्टात सूनवणीचा आग्रह धरला आहे. प्रस्तूत प्रतिनिधीला त्यांनी सांगीतले की, पोलिस प्रशासनाला या संदर्भात पत्र देण्यात आले आहे.