अनेक दिग्गजांची राजकिय फुगडी
मतदार जनताही संभ्रमावस्थेत
चंद्रपूर( हरी वार्ता नेटवर्क)
चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकी पूर्वीच अनेक दिग्गजांच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे पितळ उघडे पडत असुन तिकीट निश्चिती नंतर प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सूरू झाल्यावर हे कुठल्या स्तराला जाईल? याकडे जिल्हयातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीचे वारे वाहू लागताच अनेक हवसे, नवसे, गवसे बेडकाप्रमाणे पुढें येऊ लागले. मागील लोकसभा निवडणुकीत जो कौल मिळाला, त्यालाच आधार मानत अनेकांनी गुढघ्याला बाशिंग बांधले. यात काही जुने तर बरेच नवखे चेहरे सुद्धा अचानक पुढें आले. ज्यांचे कधी नावही लोकांनी ऐकले नाही त्यांनीं केवळ जात-समाज, प्रतिष्ठा आणि धन बलाचे भांडवल करत मुसंडी मारण्याचे धोरण अवलंबिले. सर्वात अधिक राजकिय गंमत आरक्षित चंद्रपूर क्षेत्रात बघायला मिळत आहे. याठिकाणी विरोधी पक्ष असलेल्या काँगेस कडून सुमारें 23 जणांनी ईच्छा दर्शवली. या नेत्याचा जवळचा आणि त्या नेत्याच्या जातीचा असा आपलाच निकष लावून आपले वर्चस्व दाखविण्याचा सपाटा चालवला जात आहे. हे करताना मित्र पक्ष आणि शत्रू पक्ष असा भेद सुद्धा मिटवण्याचे समाजकार्य काही इच्छुकांनी केले. यात आपलीं ज्ञात असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा यांचा बळी जातोय का? याचे साधे भान सुद्धा अनेकांना राहिले नाही. झोतात असलेल्या सर्वच पक्षांची चाचपणी करण्याचा कार्यक्रम सुद्धा काही दिग्गजांनी चालविला. या सर्व बाबी जनतेपासून लपून राहिलेल्या नाहीत. त्याचा हिशेब मतदार येणाऱ्या निवणुकीत करणार आहेच. मात्र तिकिटासाठी अध्यात- मध्यात करणाऱ्या या नेत्यांना सद्या तरी याचे भान नसल्याचे दिसून येत आहे. पक्षातील वरिष्ठांना प्रत्येक गोष्ट कळत असते. एकमेकांविरुद्ध तक्रारी होत राहतात. त्यामूळे खरा उमेदवार कोण? याची पुसटशी कल्पना त्यांना येतेच. यातुन डमी उमेदवारांची सुद्धा चाचपणी होऊन जाते. जिल्हयात सध्यातरी दोन नेत्यांना लक्ष्य करून राजकिय वातावरण ढवळून काढले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.