मूल, प्रतिनिधी
मूल शहरातील काँग्रेस भवनामध्ये महिलांना बोलावून दारू आणि पैसे वाटप केल्याची तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाड टाकून ही कारवाई केली. विजय चिमड्यालवार या व्यक्तीवर हा प्रकार घडवल्याचा आरोप असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मूल शहरात खळबळ माजली आहे.
तक्रारीनंतर भाजप कार्यकर्तेही तातडीने सक्रिय झाले. महिला मोर्चाच्या नेत्या सपना मुनगंटीवार आणि शलाका मुनगंटीवार यांनी घटनास्थळी जाऊन काँग्रेस भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गांधी चौक परिसरात या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत काँग्रेसवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. या घटनेने काँग्रेसवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.