आमदारांनी सुनावले खडे बोल
कंपनी अपघातात मृत कामगाराचे कुटुंबीय अधांतरी
चंद्रपूर, दि. 20
चंद्रपूर जिल्हयात अनेक कंपनीच्या माध्यमातून कामगांरांवर मोठा अन्याय केला जात आहे. आता तर कंपनीत काम करणा-या कामगारांचे जिवन सुरक्षीत राहिले नाही. ताडाळी येथील एमआयडीसीच्या ओमॅट वेस्ट लिमीटेड या कपंनीत 20 फुटावरून 200 किलो स्टिल स्क्रॅप अंगावर पडल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्या कंपनीतील एका कामगाराचा मृत्यू झाला असतांना त्यांच्या कुटुंबियाला मदत करण्याचे सोडून आपले हात झटकत कपंनीने कामगाराचा मृतदेह बिहार येथील त्याच्या गावी पाठविला. त्याच्या कुटुंबियाला कुठलीच मदत देण्यात आली नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. अशा असंवेदनशिलतेचा परिचय देणा-या कपंनी व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कामगारांच्या कुटुंबियाला तातडीने आर्थीक मदत देण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उदयोग, कामगार प्रधान सचिवाकडे तक्रार केली आहे.
प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे दुर्लक्ष
ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) कंपनीत झालेल्या घटनेनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. सदर कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नसून सेफ्टी ऑफिसर नाही. प्रदूषण मोठ्या प्रमाणात असून प्रदूषण नियंत्रणार्थ कुठल्याच उपाययोजना नाही. प्रदुषणामुळे कंपनी परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
परप्रांतीयांचे पोलिस व्हेरिफिकेशन नाही*
कंपनीत स्थानिक कामगार कमी आणि परप्रांतीय कामगारच जास्त प्रमाणात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन न करता कामगारांची भरती करण्यात आली आहे. या कामगारांकडून नियमानुसार ८ तासांऐवजी १२ तास काम करवून घेतले जाते. वेतनसुध्दा नियमानुसार दिले जात नाही. यासह अनेक बाबींमध्ये अनियमितता सदर कंपनीत सुरू असल्याचे आमदार अडबाले यांना आढळून आले.
सततच्या घटनांकडे कानाडोळा का झाला?
या आधीदेखील अनेक कामगारांचा कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामळे जखमी किंवा मृत्यू झाल्याचे कळते. त्यामुळे अजय रवींद्र राम या मयत कामगारास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व सदर कंपनीत व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या कामगारांच्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापन सर्वस्वी जबाबदार असून या कंपनी व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिवाळी अधिवेशनात प्रकरण गाजणार
येत्या हिवाळी अधिवेशनात सदर कंपनीच्या अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित करून कामगार व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.